DirtyHarrysblog

वासोट्याचा थरार !! साधारण ९३-९४ सालची गोष्ट ! इंजिनियरिंग ला होतो . आमचा दहा बारा मित्रांचा ग्रुप होता. एकत्र कॉलेज ला येणं जाणं आणि बरेचसे एकत्र रहाणारे ! एकदिवशी मेसहून रात्रीचं जेवण आटोपून रूम वर गप्पा मारता मारता कुठेतरी ट्रिप ला जावं हा विषय निघाला. मृणाल aka मुन्न्याने वसोट्याचा प्रस्ताव मांडला. आमच्यापैकी बऱ्याच मंडळींना वासोटा काय हे माहितच नव्हातं ! पण त्याच्या एका मित्राचा, की जो तिकडे जाऊन आला होता , थरारक किस्सा ऐकता ऐकता , आणि दहा फुटावर वाघ , बिबट्या बघायला मिळणार या लोककथा ऐकून ग्रुपने जाण्याचं नक्की केलं . संन्याशाच्या लग्नाप्रमाणे प्रवासाची तयारी शेंडीपासून म्हणजे कायकाय सोबत घेऊन जायचे , प्रवासाची आखणी , पैशाची व्यवस्था इथपासून सुरु झाली. सांगलीहून रात्री उशिरा निघून , पहाटे साताऱ्याला पोहचून पुढे बस आणि बोट मार्गे पायथ्यापर्यंत आणि मग चढाई आणि किल्ल्यावर मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी परत असा प्राथमिक बेत ठरला. प्रवासाचं planning मुन्न्याकडे , सोबतचा फराळ आणि सामान - किरण आणि प्रकाश कडे ( स्थानीय असल्यामुळे ) तर अर्थसंकल्प माझ्याकडे अशी ढोबळ आखणी झाली. निधीश आणि सुनील कडे प्रवासाची तारीख वगैरे overall नियोजन ठरलं. त्याकाळात google maps , gps वगैरे अस्तित्वात नसल्यामुळे कागदावरच प्रवासाचं planning आणि मार्ग आखून होकायंत्र सोबत घेऊन निघायचं अशी सूचना आली. त्यातच प्रकाशने , २-३ फुल्ल चिकन सोबत घेऊन , तिकडे शेकोटी वगैरे करून त्यावर भाजून खाऊ असल्या अचाट कल्पना सुचवल्यामुळे आम्ही स्वतःला शोले मधले गब्बर सिंग अशी कल्पना करू लागलो, अर्थात हेलन नव्हती हा भाग वेगळा .. पैशाची जुळणी मात्र पटकन झाली. पण सामान गोळा करण्याला आणि कॉलेज च्या classes चं वेळापत्रक जुळवायला ३-४ दिवस लागले. शेवटी निधीश आणि सुनील ने पाडव्याच्या आदल्या रात्री निघायच्या बेतावर शिक्कामोर्तब केलं. काही व्यक्तिगत कारणांमुळे आणि घरून परवानगी न मिळाल्यामुळे शेवटी आम्ही सहा आणि मुंबईकर केतन असे सात जण ठरले. पैशाची जुळणी करताना चहा-पाणी , नाष्टा , एक दोन दिवसाचा आकस्मिक खर्च सगळं गृहीत धरल्यामुळे पैशाची बाजू बळकट आहे अशी धारणा झाली. पण बोटीचा प्रवासाला किती खर्च येईल याचा अंदाज बांधणं कठीण होतं. पक्या आणि सुन्या या आमच्या RBI ने emergency म्हणून काही वाढीव रक्कम सोबत ठेवावी असं ठरलं. किरण आणि पक्या मात्र निर्धास्तपणे सामानाची जुळणी करत होते. घरून काही चपात्या , लोणचं , जॅम , बिस्कीटपुडे , breads , पाण्याच्या बाटल्या , तेल , रॉकेल , सतरंज्या, काडेपेट्या , चढाईला मदत म्हणून काठ्या सगळं जमा झालं पण आपल्या नावाला जागून 'torch' घ्यायला शेवटपर्यंत विसरले. शेवटी एकदाचा प्रवासाचा दिवस उजाडला. रात्रीचं जेवण करून उशिराच निघायचं असं ठरलं. चिकन खराब होऊ नये म्हणून उकडून घेण्याची सूचना आली. विसरलेली टॉर्च शेवटच्या क्षणी धावत पळत नवीन batteries भरून घेतली आणि दहा साडे दहाच्या सुमारास सांगली बस स्टॅण्डवर पोचलो. रात्रीची वेळ असल्यामुळे हवा थंड होती. फलाटावर बस लागायची वाट बघत असताना , हायवे वरून ट्रक ने सातारा गाठलं तर स्वस्त पडेल अशी सूचना निधीशने केली .. मग काय .. सांगलीतून पेठनाक्यापर्यंत बस आणि पुढे ट्रक हा निर्णय सगळ्यांना पसंत पडला. अर्थात ट्रक हायवे वर सोडणार , म्हणजे तिथून सातारा बस स्थानक पर्यंत चालवे लागणार होतं. पण ग्रुपचा जोश ओसंडून वहात असल्यामुळे त्याला विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणे पेठ नाक्यावर बसमधून उतरलो. साधारण अर्ध्या तासात एका ट्रक ने आम्हाला सातारा रोडला सोडायला होकार दिला आणि प्रवासभाडे नक्की करून आम्ही आत उड्या टाकल्या. साधारण ८०-९० किलोमीटर अंतर म्हणजे दोन तास असा अंदाज बांधून आमच्यातले काहीजण डुलकी काढावी म्हणून स्थिरावले. दीड च्या सुमारास ड्राईव्हर ने सूचना दिली आणि ट्रक थांबवला. आमचं सात जणांचं टोळकं गप्पा मारत , गाणी गात - थोडक्यात सांगलीच्या भाषेत 'बोंबलत' तासाभराची पायपीट करून सातारच्या बस स्थानकावर पोचलं. पहिली बस सकाळी असल्यामुळे आणि सर्वत्र शुकशुकाट याचा फायदा घेत झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी आम्ही फलाटावरच्या बाकड्यांवर आडवे झालो आणि झोप कधी लागली ते कळलंच नाही. Loudspeaker वरून होणाऱ्या सूचनांचा आणि फलाटावरून सुटणाऱ्या बसेस च्या आवाजामुळे जाग आली; घड्याळात सव्वासात वाजत होते. बस्थानकावरच्या 'अतिस्वच्छ' संडास आणि मुताऱ्यांचा वापर करून आम्ही फ्रेश झालो आणि दात घासून चहा बिस्किटावर ताव मारला. चौकशी खिडकीवरून माहिती मिळाली की कास ला जाणारी बस साधारण २० मिनिटांनी होती; याचा फायदा घेत मी आद्ल्या दिवसापासून आतापर्यंत झालेल्या खर्चाचा लेखाजोखा वहीत मांडून टाकला आणि रोख रकमेची पडताळणी केली. बस चा प्रवास सुरळीत झाला आणि मुन्न्याने निर्देश केल्याप्रमाणे आम्ही कास च्या पठाराजवळ उतरलो म्हणजे तसं आम्हाला वाटलं. पण आम्ही साधारण २ स्टॉप आधी अलीकडे उतरलो होतो हे कळायला दहा बारा किलोमीटर ची पायपीट आणि २ तास लागले. सकाळच्या रम्य देखव्यांचा आनंद घेत आम्ही पायपीट चालू ठेवली. वाटेत एक छोटेखानी तलाव लागला. तिथे थोडी विश्रांती घेतली. पाण्यात पडलेली प्रकाश टोपी कोण काढणार या प्रश्नावर निधीशने पुढाकार घेऊन उडी मारली खरी पण अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आजूबाजूच्या ५ लोकांवर उडवत पोहण्याच्या त्याच्या कलेची किरण आणि सुनील यांनी आमच्या भाषेत ' मापं ' काढली. असो टोपी मिळाली हे नसे थोडके. साधारण तासाभरानंतर उजव्याबाजूला अथांग पसरलेला शिवसागर जलाशय दिसू लागला आणि आम्ही योग्य मार्गावर आहोत याची निश्चिती झाली.सूर्य वर आल्यामुळे आजूबाजूची धुक्याची चादर विलुप्त होऊन शिवसागराच्या दोन्ही बाजूने वेढलेले गर्द हिरवे डोंगर मन मोहवत होते. दोन तास झाल्यावर मात्र अजून बोटी दिसेना त्यामुळे आणखी किती चालावे लागणार हा प्रश्न अनुत्तरित होता. शेवटी मुन्न्याला शिव्या घालत , थकून भागून साडे अकरा च्या सुमारास थोडा विश्राम करावा आणि उदरभरण ही उरकावं असा विचार करून आम्ही थांबलोच !! चालण्याची फारशी सवय नसलेल्या केतन ची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे खाण्यामुळे जरी तरतरी आली होती तरीदेखील थोडा आराम करायचा निर्णय घ्यावा लागला. नशिबाने साथ दिली आणि समोरून एक बोट येताना दिसली. तिच्या चालकाला हातवारे करून ओरडून किनाऱ्यावर बोलावले. आम्ही किल्ल्याच्या पायथ्यापासून अजून बरेच दूर असल्याचे त्याच्याकडून कळल्यामुळे आमच्या उत्साहाची जागा आता निराशेनं घेतली होती. मनातल्या मनात सर्वांनी मुन्न्या ला अजून एक शिवी घातली. जास्त वेळ वाया न घालवता आणि फारशी घासाघीस न करता त्या बोट वाल्याला वासोट्याच्या पायथ्याशी सोडायला सांगितलं. तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी परतीसाठी पायथ्याशी भेटणं नक्की झालं. तेव्हा कुठं केतन च्या जीवात जीव आला. बोटवाल्याने साधारण तीसेक मिनिटात आम्हाला वासोट्याच्या पायथ्याशी सोडलं. आता पुढचा प्रवास चढाईचा होता. हातातल्या काठ्या सांभाळत कोयनेला मिळणाऱ्या पाण्याच्या कोरड्या पात्रातून आमचा प्रवास सुरु झाला. दोन्ही बाजूला जावळीच्या जंगलाची गर्द झाडी , यातून वाट काढत आम्ही पुढे सरकत होतो. नदीपात्रातील गोटे , मोठाले विखुरलेले खडक याला वळण घालून पुढे जाताना केतन ३-४ वेळा घसरून पडला .. सुदैवाने फारसं लागलं नाही. दुपारचा सूर्य आता डोक्यावर रणरणत होता .. चढाई हळू हळू अवघड होत होती..जिथे वाटेत पाणी मिळेल तिथे तोंडावर पाण्याचा हबका मारत आलेला थकवा दूर करायचा आम्ही प्रयत्न करत होतो . त्या घनदाट जंगलातून वाट काढताना , महाराजांनी हा किल्ला कसा काबीज केला असेल याचा विचार करून मन थक्क होत होतं. चढाई च्या वाटेवर खडूने लिहिलेले फलक , दगडावर लिहिलेलं लिखाण वाचून मनोरंजनही होत होतं. 'आताशी कुठे सुरुवात आहे ' , ' एवढ्यात थकलात' , ' जिरली की नाही' अशा आशयाचे फलक वाचून आम्ही एकमेकांकडे आणि सर्वात शेवटी चालणाऱ्या केतन कडे बघत होतो. सूर्य कलंडायच्या आत किल्ल्याच्या माथ्यावर पोचणं गरजेचं होतं. एकतर सूर्यास्तानंतर जंगली श्वापदांची भीती होती आणि दुसरं म्हणजे शेकोटीसाठी आणि सोबतच्या chicken साठी लाकडं गोळा करायला वेळ हवा होता. त्यामुळे चालून चालून पाय दुखू लागले तरी थांबणं शक्य नव्हतं. त्यामुळे पाणी , ग्लुकोस D वगैरे घेऊन आलेला थकवा दूर करत संध्याकाळ होता होता आम्ही माथ्यावर पोचलो. वरती शंकराचं एक पडकं मंदिर होतं.रात्रीसाठी त्याच्या जवळच एक जागा नक्की केली आणि तिथे सतरंज्या वगैरे पसरल्या. बाकीच्या ग्रुपने तोपर्यंत लाकूडफाटा , गवत , सुक्या फांद्या गोळाकरून शेकोटीची तयारी केली. आता काळोख आणि थंडी दोन्ही वाढू लागले होते, त्यामुळे शेकोटी पेटवण्यात आली. गप्पा मारत पुढचे दोन तास कसे निघून गेले समजलेच नाहीत. कदाचित दिवसभराच्या थरारानंतर मुक्कामावर सुखरूप पोचलो याचंच समाधान जास्त होतं. जेवणाची तयारी सुरु केली आणि चिकन उघडल्यावर त्याचा उग्र वास नाकात शिरला . बहुतेक चिकन खराब झालं होतं. त्यामुळे ते न खाता उरलेल्या चपात्या , भाजी , लोणचं , bread आणि चिवडा यावर जेवण भागवले. थंडी वाढली असली तरी शेकोटी मुळे आम्ही तग धरून होतो. पण ' travel light ' असं ठरवल्यामुळे ब्लॅंकेट न घेतल्यामुळं चूक झाली हे आता जाणवू लागलं होतं.शेकोटीसाठी ची लाकडं रात्रभर पुरणार नाहीत हे आतापर्यंत लक्षात आलं होतं. हळू हळू लोकं पेंगायला सुरुवात झाली होती मग दोन -दोन चे दोन आणि तिघांचा एक असे तीन गट करून प्रत्येक गटाने तीन तास जागून पहारा द्यायचा असं ठरलं. अमावास्येच्या काळोख्या रात्री आम्ही सात जण त्या किर्रर्र जंगलात , निर्जन्य किल्ल्यावर एका शेकोटी भोवती ही कल्पनाच थरारक होती; आजही आठवण आली की शरीर रोमांचीत होतं. निधीश - मुन्न्या या पहिल्या गटाने पहारा सुरु केला आणि बाकीचे विसावले. साडे बाराच्या सुमारास मी आणि सुनीलने पहारा सुरु केला आणि शेकोटी संपू लागल्याचं दिसू लागलं. आता मात्र भयानक थंडी जाणवू लागली. शेवटी त्या पडक्या शिवमंदिरात आश्रय घ्यायचा असं ठरवलं आणि सगळ्यांना उठवून मंदिरात सतरंज्या अंथरून आश्रय घेतला. आता काळोखात मदतीला घरीच बाटलीत वात आणि रॉकेल भरून बनवलेले फक्त दोन दिवे होते. मंदिरात उंदरांचा सुळसुळाट होता. पण सर्वजण एवढे थकले होते की उंदीरच काय साप जरी अंगावरून गेला असता तरी उठले नसते. सोबत घेतलेल्या गुप्तीचा वापर करून मी आणि सुनील अधुनमधुन त्यांना हाकलत होतो. गप्पा मारत , थोड्याशा डुलक्या घेत आम्ही पहारा पूर्ण केला आणि पुढच्या तिघांना उठवून आम्ही आडवे झालो. सकाळी सहा ला किरणने हाक मारून उठवलं. बघितलं तर तो एकटाच पहाऱ्यावर बाकीचे दोन मेम्बर प्रकाश आणि केतन आपली 'तशरीफ' वर करून झोपले होते. पहारा सुरु झाल्यावर अर्ध्यातासात ते झोपल्याचं किरण ने सांगितलं. हळू हळू दिवस उजाडला आणि सर्वजण उठले. ब्रश करून तोंड धुवून किल्ल्याचा फेरफटका मारला. निसर्गाचं ते विलोभनीय रूप किल्ल्यावरून बघताना एक वेगळाच आनंद होता. धुक्याचं आवरण बाजूला करत सूर्य वर आला. निसर्गाचा आनंद घेत आम्ही सामानाची बांधाबांध सुरु केली. मात्र एक बिबट्या काय पण कोल्हा पण न दिसल्याने थोडा हिरमोड झाला. आज विचार केला की वाटतं, बरं झालं दिसला नाही. दोन चार काठ्या आणि एक दोन गुप्ती / चाकू याच्या जीवावर त्या काळोखात आम्ही स्वसंरक्षण काय करणार होतो ... तासाभरात आम्ही उतरणीला लागलो. आदल्यादिवशी केलेल्या मेहनतीनं अंग थकून गेलं होतं; पाय मण मण ओझे बांधल्यागत हळू हळू उचलत होते. भुकाही वाढू लागल्या होत्या. कसेबसे दीड दोन तासात रखडत खाली उतरलो. बोट यायला अजून तासभर होता आणि पोटपूजन करून उरली सुरली रसद संपवायचा विचार केला. ब्रेड , जॅम आणि लोणचं शिल्लक होतं , थोडी बिस्किटं होती . अधाशासारखे आम्ही त्यावर तुटून पडलो. जॅम आणि लोणच्याच्या बाटल्या फोडून तळापर्यंत सफाया केला. थोडीशी का होईना भूक भागली. थंडगार पाणी पिऊन थोडं सुस्तावलो. ठरल्याप्रमाणे बोट आली आणि एकच्या दरम्यान बोटवाल्याने आम्हाला तापोळ्याला सोडलं. सकाळच्या नाष्ट्याने भूक भागली नव्हतीच , मग काय , जवळच एक हॉटेल शोधून खाण्यावर यथेच्छ ताव मारण्यात आला. तेव्हा कुठं सगळ्यांचे आत्मे थंड झाले. पोट भरल्यावर डोकं काम न करू लागलं तरच नवल .. हॉटेलमालकाशी गप्पांच्या ओघात महाबळेश्वर तीस किलोमीटरवर असल्याचं समजलं.. मग काय .. चलो महाबळेश्वर .. प्लॅन ठरला !! मूळ plan मध्ये हा detour नसल्यामुळे budget पुरेल का हा प्रश्न होताच. शेवटी सगळा हिशेब करून रात्रीचं जेवण , उद्याचा नाष्टा , जेवण , परतीचं तिकीट आणि इतर किरकोळ खर्च वगळून एक दिवस महाबळेश्वरमध्ये थांबता येईल असा निर्णय अस्मादिकांनी दिला. पुढची बस पकडून महाबळेश्वर गाठलं. पाच -सहा गाद्या , पंखा , light , टॉयलेट आणि सकाळी अंघोळीला गरम पाणी एवढ्या माफक सुविधांसहित एक रूम बुक केली. थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी महाबळेश्वर हिंडलो. सूर्यास्ताला sun-set point वर मस्त फोटो काढले. तिथे आलेल्या पर्यटकांपैकी एका लहानग्या गोंडस मुलीचा फोटो आजही जपून ठेवलाय. रात्री जेवणाला पावभाजी वगैरे खाऊन पोट भरून रूम वर आलो. सकाळी sun-rise point ला जायचं आणि मग नाष्टा करून बस स्थानकावर परतीच्या तिकिटांची booking करायची हे नक्की केलं. गप्पा मारता मारता कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी मात्र सातपैकी मी , मुन्न्या आणि किरण असे तिघंच जण तयार होतो. बाकी मंडळी अजून घोरत पडली होती. मग आम्ही तिघांनीच सह्याद्रीच्या आणखी एका खोऱ्याचं दर्शन घेत सूर्योदय अनुभवला !! अर्थात वासोट्यावरून झालेला सूर्योदय अवर्णनीय होता पण इथेही वेगळं रूप अनुभवलं ..रूमवर आलो तर बाकी आंघोळ्या करून तयार होत होती .. महाबळेश्वर च्या मार्केट चा एक फेरफटका मारला. चहा नाष्टा उरकला पण प्रकाशने stawberry खायचा हट्ट धरला !! दुपारचं जेवण , हॉटेल चं बिल आणि परतीचं तिकीट हे खर्च बाकी असल्यामुळे , तिकिट बुक झाल्यावर बघूया असं सांगून मी त्याच्या उत्साहावर तात्पुरतं विरजण घातलं. बस स्थानकावर सांगलीसाठी च्या बस चे सात जणांचे reservation केलं.साधारण दुपारी अडीच ची गाडी होती. आकस्मिक खर्चासाठी बाजूला काढलेले पैसेही शिल्लक होते ; मग प्रकाशासाठी strawberry , ग्रुपचं दुपारचं जेवण , हॉटेल बिल आणि बाकी किरकोळ खर्च सगळं जमून आलं. महाबळेश्वर सोडलं आणि मग मात्र सर्वजण शांत झाले. एक वेगळाच आनंद , समाधान आणि तृप्ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. संध्याकाळी सांगली आणि तिथून बस पकडून माधवनगरला आमच्या राहत्या खोलीत सर्वजण सुखरूपपणे विसावलो. या तीन दिवसात जग जिंकल्याचा आनंद सर्वांना झाला होता.धडपडत -अडखळत का असेना पण एक आयुष्यभरासाठीचा एक थरारक अनुभव आम्ही सर्वानी घेतला होता. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या पुढील आयुष्यात उपयोगी पडल्या. आमचा गृप बत्तीस वर्षांनंतरही टिकून आहे. वर्षांतून एकदा तरी मित्र भेटतात, मीच बऱ्याचदा अनुपस्थित असतो. पण तरीसुद्धा ते कॉलेज चे दिवस , ते मित्र , ते अनुभव नेहमीच सोबत असतात. गेल्या आठवड्यात पाडव्याला सर्व आठवणी जागृत झाल्या , म्हणून लिहावंसं वाटलं .. धन्यवाद